Monday, December 18, 2006

तो माझा मित्र

तो माझा मित्र. शाळेत असतांनाचा. पाचवी ते दहावी पाच वर्षे आम्ही दोघे कायम एकत्र. अभ्यास, ट्रीप, स्नेहसम्मेलनातील नाटक किंवा मधल्या सुट्टीत शाळेमागच्या भेळवाल्याकडील भेळ खाणे अशा अनेक लहानमोठ्या गोष्टी तेव्हा त्याच्याशिवाय करायची कल्पना सुद्धा मी तेव्हा करू शकलो नसतो.

आज त्याची आठवण यायचे कारण म्हणजे आज मला तो भेटला, ऑर्कूटवर. मित्राच्या मित्राच्या मित्रांची friends list (भोचक पणे) बघत असतांना त्याचा फोटो दिसला. अरे हा तर अगदी होता तसाच आहे! अजुनही तोच haircut , तोंडावर तेच ओळखीचे स्मितहास्य, उंची सुद्धा एखाद दोन इंचाच्या फरकाने तितकीच! आत्ता टाय आणि बिल्ला लावून पुन्हा शाळेत गेला तरी दहावी बारावीचा विद्यार्थी म्हणून खपून जाईल. हे सगळे विचार भरभर मनात येऊन गेले आणि मी उत्सुकतेनी त्याची profile चाळू लागलो.

दहावी नंतर तो आधी ईंजीनीअर झाला, मग त्याने लॉ केले आणि पुढे IAS ची परिक्षा उत्तम score ने पास झाला. आत्ता सरकारी नोकरीत उच्चपदावर आहे. हे सगळे वाचले. तो माझा मित्र असल्याचा अभिमान वाटला.

profile मधले ईतर डीटेल्स वाचत असतांना लक्षात आले, हो या याच्या आवडी निवडी मला माहित आहेत.
आवडते लेखक जी.ए. , आवडते tv channel discovery, history channel . gr8 लेका अजुनही आपली आवड जुळतेय.

याच्या जोडीला मला अजिबात गम्य नसलेल्या काही गोष्टी जसे काव्य, नाट्यसंगीत ई.

friends list मधे जुने शाळा सोबती भेटतात का ते बघितले तर सगळेच अनोळखी चेहरे. त्यांचे विषय पण थोडे वेगळे. याचे विश्व वेगळेच दिसतेय.

दहावी नंतर तो पुढे काय काय शिकला, कुठल्या गावी होता ई. डीटेल्स ईतर कुणाकडून कधी कानी येत असत. पण डायरीत असलेला त्याचा फोन नंबर काढून कधी त्याला फोन करायची तसदी मीही कधी घेतली नाही ना त्याने. का? कारण काहीच नाही. पुन्हा बोलावे असे तितके तीव्र भावनेने वाटले नसेल म्हणून! इतकेच म्हणता येईल.

ssc च्या निकालाचा दिवस. तो merit list मधे सत्ताविसावा आणि माझे मेरीट फक्त २ मार्काने हुकलेले. गम्मत म्हणजे मला इतक्या मार्कांची अजिबात अपेक्षा नव्हती त्यामुळे मी आनंदात तर मेरीट लिस्ट मधे पहिल्या दहात नाव नसल्याने तो दुःखी. पुढे मला शाळेनंतरच्या collage नामक free world मधे जायची घाई झालेली तर त्याला आमच्याच शिस्तप्रिय शाळेच्या junior collage मधे admission घ्यायची होती. त्या दिवशी मग त्याच्या बरोबर शाळेतच admission घ्यावी का वेगळे आपल्याला हवे असलेले विषय घेऊन collage मधे जावे यावर विचार करून भरपूर डोके खपवले. " तुझा निर्णय तु घे " ही आई वडिलांकडून मुभा. शेवटी free world ने बाजी मारली.

आज इतक्या वर्षांनी तो असा अचानक profile मधून समोर आला. शाळेनंतर तो काय काय करत होता ते पुसट आणि ओझरते का होईना पण जवळून कळले.
वाटले, तेव्हा त्याच्याच बरोबर पुढे शाळेतच राहिलो असतो तर? त्याचे आणि माझे कार्यक्षेत्र एकच असते. आत्ताच्या माझ्या corporate-business world पेक्षा पुर्णतः वेगळे असे, सरकार, राजकारण, समाजकारण!

च्यायला म्हणजे आत्ता मी जो आहे तो मी नसतोच! मी कुणीतरी वेगळाच असतो!
ही जाणिव काय भयंकर आहे.
एखाद्याचे आयुष्य असे एखाद्या व्यक्तीमुळे काही विशेष कारणा अभावी सुद्धा पुर्णतः वेगळे असे घडु शकते.

(पण म्हणूनच की काय, माझे आयुष्य जसे कसे आहे ते वेळोवेळी मीच घेतलेया योग्य - अयोग्य निर्णयांमुळे आहे ही गोष्ट आज फार समाधान देणारी वाटतेय.)

Sunday, December 17, 2006

ब्लॉगची हरवलेली किल्ली अचानक पणे मिळाली. आता पुन्हा वेळ मिळेल तेव्हा ही खरडनिशी सुरू.

Saturday, February 25, 2006

सोनिया

" अरे ती सोनिया आठवते का? संजूची ती चुलत बहीण."
"ती.. हो आठवते की... का काय झालं ? "
" तिनी आत्महत्या केली "
" काऽऽऽय???"
"हो..संजू म्हणूनच दोन दिवस आली नाही."
" Shit..."

बरोब्बर चार महिन्यांपूर्वी आईनी एक दिवस सांगितले, " अरे कुणी मुलगी असेल तर पहा रे receptionist म्हणून.. सुमेधा सुटीवर जाणार आहे १५ दिवसांनी. " संजूनी तेव्हा सोनियाचा resume आणून दिला होता. सोनिया तिची चुलत बहिण. तिला नोकरीची खूप गरज आहे म्हणाली.
भेटायला बोलावले दुसर्‍या दिवशी. गोरी, बुटकी, थोडे चिंकी डोळे, दिसायला बोलायला ठिकठाक. एकूण चालून जाईल वाटली, शिवाय संजुचीच बहिण आहे म्हणून biodata मधिल माहिती जास्त नं वाचता आईच्या इथल्या clinic च्या वेळा, पगार वगैरे सांगून तिथेच डायरेक्ट join करायला सांगितले.

चार दिवस गेले असतील नसतील रात्री जेवतांना आई म्हणाली,"अरे ती सोनिया अजुन १८ पूर्ण झाली नाहिये. १७ वर्षाचीच आहे. असं कसं चौकशी नं करता माझ्याकडे पाठवलीस तीला. १८ वर्षं कम्प्लीट नसेल तर नोकरीवर ठेवता येत नाही कायद्याने काय माहित नाही का तुला!"

दुसर्‍या दिवशी मी सोनियाला भेटायला बोलावले, तिला सांगितले की तूझा interview घेतला तेव्हा तुझे वय काय हे मी बघितले नाही. काल आई कडून समजले तुझे वय, तु अजुन १८ पूर्ण नसल्याने तुला job वर ठेवता येणार नाही.

"सर पण मला खुप गरज आहे job ची " ती अतिशय आर्जवी स्वरात बोलली.

"sorry सोनिया याबाबतीत मी काहीच करू शकणार नाही. येत्या ३ मार्चला तू १८ वर्षाची होशील तेव्हा मी तुला job वर घेऊ शकीन पण आत्ता नाही. " माझे ठाम उत्तर.

तिने चार दिवस जे काम केले त्याचा हिशोब केला आणि तिला जायला सांगितले.

आणि आज कळतय तिनी आत्महत्या केली. काय कारण असेल? काय कारण असेल की तिला इतक्या कोवळ्या वयात पुढे जगणे नकोसे वाटावे? कशाने इतकी निराश झाली असेल ती की तिनी इतका भयंकर निर्णय घेतला ? बारावी मधे नापास झाली असेल म्हणून? का काही प्रेमभंग झाला असेल?... का मग... गरिबी मुळे??

तिचा तो आर्जवी स्वर पुन्हा पुन्हा आठवून अंगावर सरसरून काटा आला आणि मनात अतिशय मोठी guilt.

३ मार्च ला आणखी फक्तं सहाच तर दिवस होते....
सोनिया, थोडं आणखी थांबली असतीस तर....

Friday, January 27, 2006

लग्न झाले. reception आटोपले. नव्या बूटात पाय शिणलेले खोटे हसून तोन्ड दुखलेले अशा अवस्थेत स्टेज वरून खाली उतरलो. मान फिरवून त्या विस्तीर्ण लॉन वरचे ते झगमगते रिकामे स्टेज बघितले आणि "च्यायला सम्पले पण यार लग्न!" हा पहिला विचार मनात.
मग मुद्दाम एकदा तिथे केलेली सगळी रोषणाई, ते red carpet, ते सिंहासनासारखे सोफा डोळ्यात भरून घेतले. स्वतः काहिही विशेष कर्तृत्व केलेले नसतांना मिळालेले हे कौतुक पुन्हा काही आयुष्यात परत मिळणार नव्हते.

लग्न

माझे लग्न झाले. (हो हो हनीमून पण झाला!!) (सध्यातरी) नव्या नवलाईचे दिवस मजेत जात आहेत.
गेल्या काही दिवसात अनेकदा इथे काही गोष्टी लिहिण्याची इच्छा झाली पण स्वतःसाठी वेगळा वेळ काढणे अजुन नीट जमत नाहीये. सध्या त्याची तितकी आवश्यकता पण वाटत नाहीये.

काय रे लग्न लागतांना कसे वाटत होते? त्यादिवशी कधीतरी बहिणीने विचारले होते.
अरे बापरे मी तेव्हा त्यावर विचार करत नव्हतो!!

कानापाशी एक गुरूजी भसाड्या आवाजात मन्गलाष्टके म्हणतायत.
एका बाजुनी एक डझन कॅमेर्यांचा क्लिकक्लिकाट सुरू आहे आणि अर्धा डझन हॅन्डीकॅम माझ्याकडे रोखून बघत आहेत
समोर बघावे तर फक्त स्वस्तीक काढलेला आन्तरपाट (नाही म्हणायला तिच्या मेन्दी काढलेल्या पायाचे नखच काय तेव्हडे दिसत होते!)
डोक्यावर दर काही वेळाने अक्षतांचा मारा होतोय.
दुसर्या गुरुजींना नको तिथे खाज सुटल्याने त्यान्चे दोन्ही हात आलटून पालटून busy आहेत आणि त्या नादात दर काही वेळाने अन्तर्पाट खाली होतोय.
बाजूला उभा असलेला शेरवानी घातलेला भाचा (वय वर्षे ५) वधुपक्षातील एका त्याच्याच वया इतक्या कन्येला हेरून जमीनीवरील अक्षता गोळा करून तिच्या डोक्यावर टाकतोय.
अशा इतक्या मनोरन्जक गोष्टी आजूबाजूला घडत असतांना आत्ता मला नक्की काय वाटतय असे काही विचार करायला अजिबात वेळ झाला नाही.

काही वेळाने ती मन्गलाष्टके संपली आणि अन्तरपाट खाली झाला. समोर ती खाली मान घालून उभी होती. मला वाटलेले की ती नेहमी सारखी हसर्‍या डोळ्यांनी माझ्याकडे बघत समोर असेल पण उलट. तिच्या गालावर अश्रूंचा ओघळ.
आणि तेव्हा पहिल्यांदा हे लख्ख पणे realise झाले की ती तिच्या सगळ्या जवळच्यांना सोडून माझ्यापाशी येतेय. यापुढे तिच्या प्रत्येक सुख दुःखात मला तिला साथ द्यायची आहे. तिला सांभाळायचे आहे.

Saturday, December 03, 2005

फोन

तब्बल एक आठवडा काहीच लिहिले नाही. आठवडा कसा संपला तेही कळले नाही. रोजचे ठरावीक रुटीन चालू आहे. सकाळी उठणे, ऑफीसला जाणे, दिवसभर काम, रात्री घरी येऊन जेवणे. एखाद तास बायकोशी फोन वर गप्पा आणि मग झोपणे.
तिची आजी परवा तिला विचारत होती , "काय बोलता गं फोन वर इतके तासनतास?"
खरं म्हणजे विशेष काहीच नाही.
रोज तिला फोन केला की opening lines ठरल्या असतात.

"हॅलोऽ."
"हां बोल"
"काय करत होतीस"?

हे रोजच्या रोज मीच विचारलेलं "काय करत होतीस?" माझ्या टोटल डोक्यात जातं पण तरी गेल्या इतक्या दिवसात वेगळी काय सुरूवात करायची हे मला सुचलेले नाही. पण इतक्या दिवसात लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे ती रोज तितक्याच उत्साहानी त्या प्रश्नाला उत्तर देते. या नंतरची दहा पंधरा मिनिटे "आज दिवसभरात तु/मी काय केलं. " याचे रिपोर्टिंग. ते संपले की मग थोडा पॉझ आणि

" आणि काय??"
"आणि... आणि विशेष काही नाही."

मग विशेष काही नाही असं म्हणत म्हणत काही दुसरा विषय निघतो. तो बोलून झाला की पुन्हा एकदा,

" आणि काय??"


पण मग एखाद्या दिवशी (म्हणजे रात्री) मात्र अचानक भरभरून बोलणे होते. एकामागून एक विषय निघत जातात. नवे, जुने... मधुनच एक क्षण वाटतं आत्ता ती इथे हवी होती...

गप्पा इतक्या रंगतात की तास, दोन तास, तीन तास वेळ कसा जातोय ते समजत नसते.

"बापरे एक वाजला यार. आता फक्त पाच मिनीटे! मग झोपुयात."

"आयला पावणे दोन!!"

"लिमीट!! almost तीन वाजतायत....उद्या सकाळी लवकर उठायचे होते मला. "

असे म्हणत म्हणत साडेतीन ला जांभया देत झोप अनावर झाली असतांना फोन ठेवला जातो.

पुढचे काही दिवस मग आम्हाला हा फोन पुरतो.

Saturday, November 26, 2005

ये समा...

दर वीकेंडला रात्री "जमायचे" ही गेल्या पाच सहा वर्षा पासून बर्‍यापैकी नियमीत गोष्ट. पण गेले वर्षभर अर्धेजण नोकरी शिक्षण ई. मुळे इथे नसतात. मग उरलेले आम्ही दोघे तीघे कधी भेटतो कधी नाही. सध्या रुचा इथे परत आली आहे त्यामुळे आज तिने "जमुयात का?" चा call केला.

"हो माझे येणे पक्के. जबरी पकलोय यार!"

काही ना काही कारणाने कुणालाच जमत नव्हते पण "जबरी पकलोय" हे मनात घट्ट करून घेतल्याने "वीकेंड ला चेंज मस्ट" यावर तिची आणि माझी एकवाक्यता झाली आणि मग आम्ही दोघांनीच तिच्या घरा जवळच्या कॅफे मधे भेटायचे ठरवले. ड्राईव करत असतांना अचानक डोक्यात विचार, " आयला माझे लग्न ठरलय. रात्री १०-११ वाजता मी आणि माझी मैत्रिण असे आम्हा दोघांना लोक बघतील तर.... "
या आधी असे कधी मनात आल्याचे आठवत नाही आणि मुख्य म्हणजे मी कुणाही बरोबर असलो तरी त्यासाठी मी कुणाला answerable नव्हतो. पण आता...

तरी तो विचार बाजूला ठेवला. कॅफे मधे अजिबात गर्दी नव्हती, बसायला कोपर्‍यातला सोफा. बसल्या बसल्याच " आज या कॅफे वाल्यां बरोबरच इथून बाहेर पडायचे " असे आम्ही दोघांनीही लगेच ठरवून टाकले. आणि केलेही तसेच. दोन तास ऐसपैस गप्पा. वाफाळती कॉफी. विषय : लग्न, बांधीलकी, तिचा BF, माझी होणारी बायको... आपल्याला जसा हवा होता तसा life partner मिळालाच नाही यावर लवकरच शिक्कामोर्तब झाले. पण गम्मत अशी की तिला आणि मला कुणालाच याचे अजिबात दुःख नव्हते!!

मला अबोल बायको अजिबात चालणार नव्हती पण ती अबोल आहे. रुचाला चिक्कार शिकलेला नवरा हवा होता पण तिचा बॉयफ्रेंड जेमतेम शिकलेला आहे. Housewife अजिबात नको ही माझी आणखी एक अट पण "मला घरातले बघायची बर्‍यापैकी आवड आहे " असे तिने स्पष्ट सांगुनही मी तिलाच हो म्हटले. veggie नवरा पाहीजे म्हणणार्‍या रुचा चा BF CKP आहे.

बारा वाजता रुचाला तिच्या घरापर्यंत सोडले. मस्त गेली शनिवार रात्र आता पुन्हा कधी जमणार माहीत नाही म्हणत कार स्टार्ट केली आणि गाणे सुरू झाले,

ये समा, समा है ये प्यार का, किसी के इन्तजार का
दिल ना चुराले कही मेरा मौसम बहार का

बसने लगे आखो मे कुछ ऐसे सपने
कोई बुलाये जैसे, नैनो से अपने
ये समा, समा है दिदार का, किसी के इन्तजार का
दिल ना चुराले कही मेरा मौसम बहार का

मिल के खयालो मे ही, अपने बलम से
निन्द गवायी अपनी, मैने कसम से
ये समा, समा है खुमार का, किसी के इन्तजार का
दिल ना चुराले कही मेरा मौसम बहार का

आणि मग त्या क्षणी फक्त तिचीच अतिशय तीव्रतेने आठवण झाली. शेजारच्या रिकाम्या सीट कडे बघून आणखीनच.

Friday, November 25, 2005

खोली

अस्ताव्यस्त पसरलेली खोली एकदाची आवरून झाली. साधारणपणे माझ्या खोलीचे वर्णन करायचे झाले तर असे सांगता येईल. खुर्चीवर, पलंगावर, जमीनीवर (थोडक्यात सांगायचे तर खुंटी सोडून ईतर सगळीकडे) पडलेले कपड्यांचे बोळे, टेबलवर, गादीच्या कडे कपारीत घुसलेली पुस्तके. एखाद्या कोपर्‍यात कायम "तयार" असलेली माझी traveling bag. कॅसेटसचा कोलमडलेला ढिगारा. कवर शिवाय बेघर झालेल्या अनेक कॅसेट्स. स्वयंपाकघरातून इम्पोर्ट झालेले काही खाऊचे डबे. टेबलावरच पसरलेली बिनकामाची अनेक कागदपत्रे. आणि या सगळ्यामधे माझे सगळे नीट सुरू आहे ना हे मिशा फेंदारून बघायला येणारे एखादे झुरळ.

या सर्व वस्तूंना त्यांची योग्य जागा दाखवायचे काम मी अधुनमधून करत असतो पण तरी रविवारी आवरलेली खोली सोमवारी सकाळी पुन्हा पहिले सारखीच झाली असते.

पण आज आवरलेली खोली आता उद्या पसरणार नाही. उद्या पासून तिच्या कायापालटाचे काम सुरू. भिंतींना नवा रंग लागेल. नवे फर्नीचर येईल. जमिनीवरची गादी जाऊन किन्ग साईझ डबलबेड येईल. खोली कशी "एलीगन्ट" दिसेल याचे सुरेख चित्र डोळ्यापुढे उभे राहते आहे. पण त्याबरोबरच वर्षानुवर्ष वापरलेले स्टडी टेबल असणार नाही. कपड्याचे बोळे कोंबायचे कपाट असणार नाही. रीबॉक ची मॉडेल, गणपती आणि आयफेल टॉवर अशी एकमेकांशी अजिबात संबन्ध नसलेली पोस्टर्स भिंतीवर एकशेजारी असणार नाहीत ना त्यांच्या चिकट्पट्ट्यांचे डाग. या पुढे या गोष्टी असणार नाहीत. आणि त्या बरोबरच "माझी" खोली सुद्धा नसेल. जी नविन खोली असेल ती "आमची" बेडरूम असेल. (ही गोष्ट मनाला गुदगुल्या करणारी असली तरी आता यापुढे आयुष्यभर सगळे शेअर करायचे ही जाणिव अशा एखाद्या क्षणी खटकन टोचतेच!)
माझ्या खरडपट्टीचा आजपासून श्रीगणेशा. जसे जमेल तसे, जे वाटले तसे इथे खरडायचे ठरवले आहे.