Saturday, December 03, 2005

फोन

तब्बल एक आठवडा काहीच लिहिले नाही. आठवडा कसा संपला तेही कळले नाही. रोजचे ठरावीक रुटीन चालू आहे. सकाळी उठणे, ऑफीसला जाणे, दिवसभर काम, रात्री घरी येऊन जेवणे. एखाद तास बायकोशी फोन वर गप्पा आणि मग झोपणे.
तिची आजी परवा तिला विचारत होती , "काय बोलता गं फोन वर इतके तासनतास?"
खरं म्हणजे विशेष काहीच नाही.
रोज तिला फोन केला की opening lines ठरल्या असतात.

"हॅलोऽ."
"हां बोल"
"काय करत होतीस"?

हे रोजच्या रोज मीच विचारलेलं "काय करत होतीस?" माझ्या टोटल डोक्यात जातं पण तरी गेल्या इतक्या दिवसात वेगळी काय सुरूवात करायची हे मला सुचलेले नाही. पण इतक्या दिवसात लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे ती रोज तितक्याच उत्साहानी त्या प्रश्नाला उत्तर देते. या नंतरची दहा पंधरा मिनिटे "आज दिवसभरात तु/मी काय केलं. " याचे रिपोर्टिंग. ते संपले की मग थोडा पॉझ आणि

" आणि काय??"
"आणि... आणि विशेष काही नाही."

मग विशेष काही नाही असं म्हणत म्हणत काही दुसरा विषय निघतो. तो बोलून झाला की पुन्हा एकदा,

" आणि काय??"


पण मग एखाद्या दिवशी (म्हणजे रात्री) मात्र अचानक भरभरून बोलणे होते. एकामागून एक विषय निघत जातात. नवे, जुने... मधुनच एक क्षण वाटतं आत्ता ती इथे हवी होती...

गप्पा इतक्या रंगतात की तास, दोन तास, तीन तास वेळ कसा जातोय ते समजत नसते.

"बापरे एक वाजला यार. आता फक्त पाच मिनीटे! मग झोपुयात."

"आयला पावणे दोन!!"

"लिमीट!! almost तीन वाजतायत....उद्या सकाळी लवकर उठायचे होते मला. "

असे म्हणत म्हणत साडेतीन ला जांभया देत झोप अनावर झाली असतांना फोन ठेवला जातो.

पुढचे काही दिवस मग आम्हाला हा फोन पुरतो.

0 Comments:

Post a Comment

<< Home