Saturday, February 25, 2006

सोनिया

" अरे ती सोनिया आठवते का? संजूची ती चुलत बहीण."
"ती.. हो आठवते की... का काय झालं ? "
" तिनी आत्महत्या केली "
" काऽऽऽय???"
"हो..संजू म्हणूनच दोन दिवस आली नाही."
" Shit..."

बरोब्बर चार महिन्यांपूर्वी आईनी एक दिवस सांगितले, " अरे कुणी मुलगी असेल तर पहा रे receptionist म्हणून.. सुमेधा सुटीवर जाणार आहे १५ दिवसांनी. " संजूनी तेव्हा सोनियाचा resume आणून दिला होता. सोनिया तिची चुलत बहिण. तिला नोकरीची खूप गरज आहे म्हणाली.
भेटायला बोलावले दुसर्‍या दिवशी. गोरी, बुटकी, थोडे चिंकी डोळे, दिसायला बोलायला ठिकठाक. एकूण चालून जाईल वाटली, शिवाय संजुचीच बहिण आहे म्हणून biodata मधिल माहिती जास्त नं वाचता आईच्या इथल्या clinic च्या वेळा, पगार वगैरे सांगून तिथेच डायरेक्ट join करायला सांगितले.

चार दिवस गेले असतील नसतील रात्री जेवतांना आई म्हणाली,"अरे ती सोनिया अजुन १८ पूर्ण झाली नाहिये. १७ वर्षाचीच आहे. असं कसं चौकशी नं करता माझ्याकडे पाठवलीस तीला. १८ वर्षं कम्प्लीट नसेल तर नोकरीवर ठेवता येत नाही कायद्याने काय माहित नाही का तुला!"

दुसर्‍या दिवशी मी सोनियाला भेटायला बोलावले, तिला सांगितले की तूझा interview घेतला तेव्हा तुझे वय काय हे मी बघितले नाही. काल आई कडून समजले तुझे वय, तु अजुन १८ पूर्ण नसल्याने तुला job वर ठेवता येणार नाही.

"सर पण मला खुप गरज आहे job ची " ती अतिशय आर्जवी स्वरात बोलली.

"sorry सोनिया याबाबतीत मी काहीच करू शकणार नाही. येत्या ३ मार्चला तू १८ वर्षाची होशील तेव्हा मी तुला job वर घेऊ शकीन पण आत्ता नाही. " माझे ठाम उत्तर.

तिने चार दिवस जे काम केले त्याचा हिशोब केला आणि तिला जायला सांगितले.

आणि आज कळतय तिनी आत्महत्या केली. काय कारण असेल? काय कारण असेल की तिला इतक्या कोवळ्या वयात पुढे जगणे नकोसे वाटावे? कशाने इतकी निराश झाली असेल ती की तिनी इतका भयंकर निर्णय घेतला ? बारावी मधे नापास झाली असेल म्हणून? का काही प्रेमभंग झाला असेल?... का मग... गरिबी मुळे??

तिचा तो आर्जवी स्वर पुन्हा पुन्हा आठवून अंगावर सरसरून काटा आला आणि मनात अतिशय मोठी guilt.

३ मार्च ला आणखी फक्तं सहाच तर दिवस होते....
सोनिया, थोडं आणखी थांबली असतीस तर....

2 Comments:

Blogger Amit Bapat said...

मनाला चटका लावणारी गोष्ट सांगितलीत... पण मग ती पुरी का नाही करीत?

3:40 PM  
Blogger me_kon said...

गोष्ट इतकीच आहे अमित.

12:05 PM  

Post a Comment

<< Home